पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. अहमदाबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधीनगरमधील एका स्मशानघाटावर पंतप्रधान मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विदेशांतील अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, आई गमावण्यापेक्षा कोणतेही दुःख मोठे नाही. पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनाबाबत मी शोक संवेदना व्यक्त करतो असे जपानचे पंतप्रधान फुमियो किशीदा यांनी म्हटले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो असे त्यांनी ट्विट केले आहे.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्यासह भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव, सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही शोक व्यक्त केला आहे. भारतातील जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमॅन यांनी ट्वीट केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईच्या निधनाबाबत आम्ही संवेदना व्यक्त करतो. अशा दुःखाच्या प्रसंगी आम्ही मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमेवत आहोत.
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हिराबेन मोदी यांना मंगळवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अहमदाबाद येथील केयूएन मेहता हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे साडेतीन वाजता त्यांचे निधन झाले.