‘व्हीएसआय’मध्ये तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेची जोरदार तयारी सुरु

जागतिक साखर उद्योगाला मार्गदर्शक ठरणारी तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद १२ ते १४ जानेवारी २०२४ रोजी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) होत आहे. या परिषदेत देश-विदेशांतील सुमारे दोन हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या माध्यमातून ज्ञान, तंत्रज्ञान आणि आचार-विचारांची देवाण-घेवाण होणार आहे. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे संकल्पक, खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची जोरदार तयारी सुरु आहे. या परिषदेसाठी ‘चीनीमंडी’ मिडिया पार्टनर आहे.

‘व्हीएसआय’चे सल्लागार शिवाजीराव देशमुख ‘चीनीमंडी’शी बोलताना म्हणाले कि, ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने व संधी’ या विषयावर होत असलेल्या या परिषदेच्या निमित्ताने ‘व्हीएसआय’च्या मांजरी फार्मवर भव्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ या परिषदेत साखर उद्योग व संलग्न क्षेत्रावर सादरीकरण करणार आहेत. परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या प्रदर्शनात जागतिक साखर उद्योगाच्या उभारणीतील सध्याची प्रगत उत्पादने, सेवा यांची माहिती मिळणार आहे. जगभरातील २०० पेक्षा जास्त सेवा पुरवठादारांना भेटण्याची संधी या परिषदेच्या निमित्ताने मिळणार आहे.

‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील म्हणाले कि, देशाचे माजी कृषी मंत्री आणि ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून साखर उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद व प्रदर्शन भरविण्यास प्रारंभ झाला. ‘व्हीएसआय’तर्फे आयोजित यापूर्वीच्या दोन्ही साखर परिषदांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यंदा होणारी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदही देशभरातील हजारो शेतकरी, साखर कारखानदार, शेती तज्ञ, संशोधक विद्यार्थी या सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद यशस्वी करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचे कडू-पाटील यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here