ब्रिटनमध्ये शीतपेयांवरील शुगर टॅक्स योजना रद्द करण्याची तयारी

लंडन : ब्रिटनच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनी महागाईचे संकट कमी करण्यासाठी शीतपेयांवरील शुगर टॅक्स योजना रद्द करण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त द टाइम्सने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. अर्थ मंत्री क्वासी क्वार्टेंग यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना लठ्ठपणा नियंत्रण उपाययोजनांचे पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा आढावा घेतल्यानंतर काही नियंत्रणे उठवली जातील, अशी शक्यता आहे.

द टाइम्सने म्हटले आहे की, अस्वास्थ्यकारी भोजनावरील एक खरेदी करा, एक मोफत मिळवा या योजनेच्या प्रचारावर सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला घातलेली बंदी मागे घेतली होती. महागाईने त्रस्त लोकांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच मॉल, शॉपिंग सेंटरमधील चेकआऊटमध्ये मिळणाऱ्या मिठाई तसेच चॉकलेटवर पुढील महिन्यात लागू करण्यात येणारे निर्बंधही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. ऑगस्ट महिन्यात डेली मेलला दिलेल्या एका मुलाखतीत ट्रस यांनी म्हटले होते की, त्यांचे सरकार अस्वास्थ्यकारी भोजनावर कोणतेही नवे शुल्क आकारणार नाही. आपण काय खावे हे सरकारने सांगावे असे लोकांना योग्य वाटत नाही, असा दावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here