रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सातत्याने आपल्या व्यवायाचा विस्तार सुरू ठेवला आहे. गेल्या वर्षी त्यांनी कोला मार्केटमध्ये उतरण्यासाठी डील केली होती. आणि होळीनंतर रिलायन्सने ७०च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर लाँच करण्यात येत असल्याची घोषणा करत बाजारात एन्ट्री केली. त्यानंतर आता कोला मार्केटमध्ये प्राइस वॉर सुरू झाले आहे. दुसऱ्या कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्ट्च्या दरात कपात सुरू केली आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कॅम्पा कोलाची थेट टक्कर पेप्सी, कोका कोला आणि स्प्राइटसोबत आहे. कॅम्पा कोलाचे तीन फ्लेवर लाँच झाल्यानंतर मार्केटमध्ये दबदबा असलेल्या दुसऱ्या कंपन्या दबावात आल्या आहेत. वाढते तापमान आणि सॉफ्ट ड्रिंकची मागणीने नफा वाढता असताना कोका कोलाने खास करून अशा राज्यांमध्ये आपल्या किमतीत कपात केली आहे, ज्या ठिकाणी स्टॉक कमी आहे. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार कंपनीने २०० एमएलच्या बाटलीच्या दरात ५ रुपयांची कपात केली आहे. कंपनीची दरकपात मध्ये प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात असेल. येथे २०० एमएलची बाटली १५ ऐवजी १० रुपयांना मिळेल. विक्रेत्यांचे क्रेट डिपॉझिटही रद्द करण्यात आले आहे.