साखरेसाठी बिट लागवडीला प्रोत्साहन; बारामती अॅग्रोचा निर्णय

पुणे : चीनी मंडी बारामती अॅग्रो या कृषि क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने साखरेसाठी बिट लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बारामती अॅग्रोचे सीईओ रोहित पवार यांनी दिली. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) अध्यक्षपदाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या पवार यांचे दोन साखर कारखाने आहेत. यंदाच्या हंगामापासून बिटाचा प्रयोग सुरू करणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, चंदिगडमधील रामा शुगर ही कंपनी २०१२पासून मर्यादित प्रमाणात बिटाची लागवड करत आहे. तर, मुंबईत मुख्यालय असलेल्या रेणुका शुगर्सनेही यापूर्वी थोड्या फार प्रमाणात बिटाचा प्रयोग केला आहे.

पाणी लागते कमी

या संदर्भात पवार म्हणाले, ‘जर, साखरेसाठी बिटाची लागवड केली, तर शेतकरी आणि साखर कारखाने दोघांनाही फायदा होणार आहे. मुळात बिट हे कमी कालावधीचे पिक आहे. त्याच्यासाठी पाणीही कमी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा आहे. दुसरीकडे बिटामुळे साखर कारखान्यांना त्यांची क्षमता पूर्णपणे वापरण्याची संधी आहे.’

ते म्हणाले, ‘महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमीळनाडूमध्ये कारखान्यांच्या क्षमतेचा वापर अपेक्षेप्रामाणे होताना दिसत नाही. त्यांचा सिझन खूप छोटा असतो. त्यामुळे साखरेचा गाळप हंगाम संपल्यानंतर हे कारखाने बिटापासून साखर तयार करू शकतात आणि दीर्घकाळ कारखाना चालवू शकतात.’

यासाठी साखर कारखान्यांना केवळ एक डिफ्युजर घ्यावा लागणार आहे. त्यासाठीचा खर्च केवळ २० ते २५ कोटी रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. कारखान्यातील इतर पायाभूत सुविधा कायम राहणार आहेत. त्यामुळे आम्ही हा निर्णय अतिशय जोरकसपणे घेणार आहोत. एकदा आमच्याकडे पुरेसा डेटा आला तर, त्यानंतर आम्ही तो इतर साखर कारखान्यांशी शेअर करणार आहोत, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

SOURCEChiniMandi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here