थकबाकीप्रकरणी यूपीमध्ये कारखाना मालकांची मालमत्ता जप्त

लखनऊ : चीनी मंडी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे न दिल्याप्रकरणी उत्तर प्रदेशात तीन साखर कारखाना मालकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मोदीनगरजवळच्या सिक्री खुर्द येथे गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली असून, त्यात ७ हजार क्विंटल साखर, तीन कार्यालये आणि एका फार्म हाऊसला टाळे ठोकण्यात आले आहे.

उसाची बिले थकविल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन साखर कारखान्यांविरोधात कारवाई केली आहे. रिकव्हरी प्रमाणपत्र दिल्यानंतरही हे कारखाने बिले भागवण्यात अपयशी ठरले होते. गाझियाबाद जिल्हा प्रशासनाने मोदी नगर साखर कारखान्याची पाच बँक खाती गोठवली आहेत. या कारखान्याची १५० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

मोदी नगरचे तहसीलदार राज बहादूर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने सिकरी खुर्दमधील तीन कार्यालये, फार्म हाऊस आणि ७ हजार क्विंटल साखर जप्त केली आहे. डिस्टलरी युनिटमधील जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १० कोटी रुपये आहे. मोदी इंडस्ट्रिज लिमिटेडचे उमेश मोदी हे गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर साखर कारखाना आणि बाघपत येथील मलकापूर साखर कारखाना चालवतात.

दरम्यान, बुलंदशहर जिल्हा प्रशासनाने वेव शुगर इंडस्ट्रिज लिमिटेडच्या सरव्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. जिल्हा ऊस अधिकारी डी. के. सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार या साखर कारखान्याची २४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. जर, थकबाकी दिली नाही तर, बँका खाती सील करण्याचा आणि अटक करण्याचा इशारा दिल्याची माहिती उपविभागीय दंडाधिकारी अरविंद सिंह यांनी दिली. सिंभोली साखर कारखान्याची १२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. हापूर जिल्हा प्रशासनाने या कारखान्याच्या विरोधातही कारवाईला सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी ओम प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्याच्या ब्रिजनाथपूर युनिटची ७१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या कारखान्याची १.२५ क्विंटल साखर सिंभोली युनिटमधून तर, ७० हजार क्विंटल साखर ब्रिजनाथपूर युनिटमधून जप्त केल्याची माहिती उपविभागीय न्यायदंडाधिकारी सत्य प्रकाश सिंह यांनी दिली.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here