भरलेल्या, रिकाम्या ऊस वाहनांची छापील पावत्या द्या: वैधमापणचे कारखान्यांना आदेश

128

कोल्हापूर, ता. 4 : साखर कारखान्यांकडून ऊस टनामध्ये काटामारी केली जाते, हे जग जाहीर असताना आता भरलेल्या ट्रक, ट्रॉलीचे वजनाची छापील पावती देण्याऐवजी रिकाम्या झालेल्या ट्रॉलीचे वजन देवून मापात पाप करण्याचे काम केले जात आहे. यासाठी ऊसान भरलेल्या ट्रक़, ट्रॅक्‍टर व बैलगाडीसह होणाऱ्या वजनाची पावती देण्याची सक्ती करावी, अशी मागणी जय शिवराय किसान संघटना व आंदोलन अंकूशच्यावतीने जिल्हा वैधमापण शास्त्राचे सहाय्यक नियंत्रक तोमर सिंह मोहन यांच्याकडे करण्यात आली. यावर, प्रत्येक साखर कारखान्याने भरलेल्या आणि रिकाम्या वाहनांच्या छापली पावत्या देण्याचे आदेश श्री तोमर सिंह मोहन यांनी दिले.

जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने म्हणाले, कोणत्याही साखर कारखान्यात उसाने भरलेली गाडी गेल्यानंतर भरलेल्या वाहनाचे वजन स्लीप वेगळी मिळाली पाहिजे. ऊस उतरल्यानंतर रिकाम्या वाहनाचे वजन स्लीप वेगळी मिळाली पाहिजे. भरलेल्या उसाची पावती दिली जात नाही. तर कागदावरच लिहून ठेवले जाते. यामध्ये एखाद्या भरलेल्या गाडीचे वजन 10 टन येत असेल तर तशी छापील पावती दिली पाहिजे. तीच उसाची गाडी रिकामी झाल्यानंतर भरलेल्या गाडीसह झालेल्या वजनातून रिकाम्या गाडीचे वजन वजा करून शिल्लक राहिलेल्या निव्वळ टनाची पावती शेतकऱ्यांचा हातात दिली तर लाखो रुपयांची भ्रष्टाचार थांबणार आहे. वजन काट्यातून लुट होत असताना आता वजन चिठ्ठीतूनही शेतकऱ्यांची लुट सुरू आहे.

आंदोलन अंकूशचे अध्यक्ष धनाजी चूडमुंगे म्हणाले, वजन मापे कार्यालयाने याची तात्काळ दखल घेवून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. ऊस तोडून घेतल्यानंतर वजन मोजणीसाठी प्रत्यक्ष शेतकरी तिथे उपस्थित नसतो. त्यामुळे, शेतकऱ्यांची फसवणूक आणि लुट होवू शकते. यावेळी धनाजी पाटील, उत्तम पाटील, विकास शेसवरे, कृष्णकांत रेंगडे, दत्ता शिंदे रामदास वड्ड, शितल कांबळे, मोहन यादव, महावीर वळीवडे उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here