पुणे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने विविध लसीकरण केंद्रांमार्फत लसीकरणाचा कार्यक्रम युद्धपातळीवर राबविला जात आहे. यामध्ये राज्यातील सर्व सहकारी/खाजगी साखर कारखान्यांनी लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व कारखान्यांनी आपापल्या परिसरात लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
साखर आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात म्हटले आहे की, सर्व विभागांतील कारखाना प्रशासनाने आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून कारखाना परिसरामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात समन्वय राखावा. त्यातून कारखाना परीसरातील नागरीकांना लस उपलब्ध करुन देणे सोयीचे होईल. याबाबत साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी आपल्या विभागातील साखर कारखान्यांच्या परिसरामध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्यासंदर्भात आरोग्य विभाग/स्थानिक प्रशासनाशी समन्वय राखावा. साखर कारखान्याकडून जागा उपलब्धता तसेच इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. कारखाना प्रशासन तसेच आरोग्य विभागाच्या सहकार्याने जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेऊन लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशा सूचना आयुक्त गायकवाड यांनी दिल्या आहेत.