पुणे : हुमणी किडीचे जीवनचक्र साधारण वर्षभराचे असून ते चार टप्प्यांत चालते. या किडीमुळे पिकांचे सर्वाधिक नुकसान ‘अळी’ अवस्थेत होते. त्यामुळे अळीच्या वाढीच्या अवस्थेनुसार व्यवस्थापन केल्यास नियंत्रणाचा खर्च कमालीचा कमी होतो. शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले. इंदापूर तालुक्यातील न्हावी येथे कृषी विभागाच्यावतीने ‘हुमणी कीड नियंत्रण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ आणि उप कृषी अधिकारी जी. डी. खंडागळे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रात्यक्षिकाच्या वेळी सहायक कृषी अधिकारी पी. बी. मोहोळकर, हनुमंत मारकड, योगेश टिळेकर, बापूराव मारकड यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगतशील शेतकरी संतोष श्रीरंग मारकड यांच्या शेतात हुमणी नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळा’ तयार करण्याचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी हुमणी किडीचा जीवनक्रम उलगडला. कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या झाडांवर भुंगेरे पाला खाण्यासाठी येतात, तिथे १ बाय १ मीटरचा खड्डा खणावा. त्यात पिवळ्या रंगाचा प्लास्टिक कागद टाकून कडा मातीने दाबून घ्याव्यात. खड्ड्यात ७५ टक्के पाणी भरून १ लीटर जळके काळे ऑइल टाकावे. खड्ड्यापासून एक फूट उंचीवर २०० वॅटचा साधा बल्ब लावावा. प्रकाशाकडे आकर्षित होऊन भुंगेरे पाण्यात पडतात व नष्ट होतात. एरंडीच्या बिया वापरूनही हा प्रयोग करता येतो. भुंगेरे नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्यास पिकाचे नुकसान होत नाही.


















