पुणे : येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चार जागांसाठी शनिवारी, दि. १५ रोजी मतदान होणार आहे. शिरोली बुद्रुक येथील निवृत्तीशेठ शेरकर सांस्कृतिक भवन येथे रविवारी मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी ही माहिती दिली. मतदान केंद्रावर एक पोलिस निरीक्षक, सात अधिकारी व ३१ पोलिस कर्मचारी असे ४० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतमोजणी कक्षामध्ये मतमोजणी ओळखपत्र आवश्यक असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. चार जागांसाठी एकूण पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतदान साहित्य वाटप शुक्रवारी अपेक्षित आहे.
विघ्नहर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या आहेत. शिवनेर पॅनेलचे वर्चस्व राखले आहे. बिनविरोध निवड झालेले अविनाश पुंडे, बाळासाहेब घुले, पंकज वामन, रामदास वेठेकर, संजय खेडकर हे नवीन चेहरे आहेत. तर अध्यक्ष सत्यशील शेरकर व संचालक संतोष खैरे निवडणूक रिंगणात आहेत. माजी संचालक प्रकाश जाधव, विलास दांगट बिनविरोध झाले आहेत, तर सुरेश गडगे निवडणूक रिंगणात आहेत. उत्पादक सभासद प्रतिनिधी मतदारसंघाच्या शिरोली बुद्रुक गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. यात शिवनेर पॅनेलकडून विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर, संचालक संतोष खैरे, तसेच सुधीर खोकराळे उमेदवार असून, त्यांच्या विरोधात रहेमान इनामदार निवडणूक रिंगणात आहेत.