पंजाब: फगवाडा साखर कारखाना अद्याप बंदच

जालंधर : राज्य सरकार फगवाडातील गोल्डन संधार कारखान्यात आगामी गळीत हंगामासाठी ऊस गाळप सुरू करेल अशी घोषणा गेल्या आठवड्यात कृषी मंत्री कुलदीप सिंह धालीवाल यांनी केली होती. या घोषणेनंतरही कारखाना अद्याप बंदच आहे.

प्रसार माध्यमातील रिपोर्टनुसार, कारखान्याकडे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. कारखान्याची आर्थिक स्थिती अशी आहे की कोणताही अधिकारी तो सुरू करण्याचे धाडस करू इच्छित नाही. याशिवाय खासगी कारखानदारही आता मागे हटले आहेत. दुसरीकडे कारखान्याशी संलग्न ३००० शेतकरी २२,००० एकरात ऊस शेती करीत आहेत. आणि ७० लाख क्विंटल ऊस उत्पादनाची अपेक्षा हे शेतकरी करीत आहेत. कारखाना पुन्हा सुरू व्हावा अशी त्यांची मागणी आहे. नवाशहर, होशियारपूर, नकोदर, गोराया, फिल्लौर आणि फगवाडा विभागातील हे शेतकरी आहेत.

सरकारने नवाशहरच्या शेतकऱ्यांना भोगपूर कारखान्याकडे वळविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, इतर कारखान्यांत ऊस स्थलांतरीत करणे अव्यवहार्य असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. टर्बाइन ब्लास्टमुळे भोगपूर कारखाना कार्यरत नाही. धुरी कारखाना वादग्रस्त बनला आहे. इतर कारखान्यांना आधीच क्षमतेपेक्षा अधिक ऊस मिळत आहे. जर फगवाडा कारखाना सुरू झाला नाही तर इतर कारखान्यांना गळीत हंगाम १० एप्रिलऐवजी १० जूनपर्यंत वाढवावा लागेल. फगवाडा कारखान्याशी संलग्न शेतकऱ्यांनी दावा केला की, त्यांना वाहतुकीसाठी किमान ४ कोटी रुपये जादा खर्च करावे लागतील. शेतकऱ्यांनी सांगितले की, आम्ही प्रातिनिधीक विरोध आंदोलन करीत आहोत. मात्र, कोणत्याही हालचाली दिसत नाही. कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू झाला पाहिजे असे आमचे प्रयत्न आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here