केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत रबी पिकाचे क्षेत्र 24.13 लाख हेक्टरने वाढले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रबी पिकांच्या स्थितीचा आढावा घेताना, लागवडीखालील क्षेत्राबद्दल समाधान व्यक्त केले, आतापर्यंत गहू लागवडीखालचे क्षेत्र 152.88 लाख हेक्टर आहे, जे मागच्या वर्षी, याच काळात 138.35 हेक्टर होते. मुख्य गहू उत्पादक राज्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाखालचे क्षेत्र वाढले असल्याची माहिती देण्यात आली आहे. गहू लागवडीखालचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.53 लाख हेक्टरने वाढले आहे आणि हे गेल्या चार वर्षातील सर्वाधिक आहे.
दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजीच्या स्थितीनुसार, रबी पिकांच्या लागवडीखालचे एकूण क्षेत्र 358.59 लाख हेक्टर (जे सर्वसामान्य रबी क्षेत्राच्या 57% आहे), आहे. गेल्या वर्षी याच काळात हे 334.46 लाख हेक्टर होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रबी पिक लागवडीचे क्षेत्र 24.13 लाख हेक्टरने वाढले आहे. (सविस्तर माहिती परिशिष्टात देण्यात आली आहे)
अनुकूल मृदा ओलावा, पाण्याची सुधारलेली उपलब्धता आणि देशभरात खतांची पुरेशी उपलब्धता यामुळे आगामी काळात रबी पिकाचे लागवड क्षेत्र वाढून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे, असे तोमर म्हणाले.
सद्यस्थितीत देशभरातील 143 जलाशयांत पाण्याची उपलब्धता 149.49 अब्ज क्युबिक मीटर (24 नोव्हेंबर 2022 ला संपलेल्या आठवड्यात) आहे, जी गेल्या वर्षीच्या याच काळातील उपलब्धतेच्या 106 टक्के आहे आणि गेल्या 10 वर्षातील याच काळातील सरासरी उपलब्धतेच्या 119 टक्के आहे. 15 – 21 नोव्हेंबर, 2022 या काळातील मृद ओलावा बहुतांश जिल्ह्यांत गेल्या 7 वर्षांतील याच काळाच्या सरासरी पेक्षा जास्त आहे.
(Source: PIB)