मेरठ : अलिकडेच झालेल्या पावसाने आणि अतिवृष्टीने उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानभरपाई दिली जावी यासाठी अधिकारी सर्व्हे करीत आहेत. पावसाने सर्वाधिक नुकसान भात पिकाचे झाले आहे. ज्या पिकांवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत, त्यामध्ये ऊस, बटाटे, मोहरी, डाळी आदींचा समावेश आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भारतीय किसान संघ भानू गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवाकर सिंह यांनी महसूल विभाग केवळ कागदोपत्री नुकसानीचे सर्वेक्षण करीत असल्याचा आरोप केला. सर्व्हे करताना शेतकऱ्यांशी संपर्क साधलेला नाही. अधिकारी मनमानी पद्धतीने अहवाल सादर करीत आहेत. ते शेतात उभा असलेल्या भात पिकाचे २५ टक्के तर कापलेल्या पिकाचे ५० टक्के नुकसान दाखवत आहेत. दुसरीकडे काही ठिकाणी पिकांचे ७० टक्के नुकसान झाले आहेत. भात पिक काळे पडले आहे. जोरदार पावसाने तांदळाची गुणवत्ता बिघडल्याचा भाकियूचा आरोप आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.