नवी दिल्ली : उत्तर भारतात पुन्हा एकदा उकाडा वाढू लागला आहे. अनेक दिवस झालेल्या अवकाळी पावसानंतर आता तापमान वाढू लागले आहे. मात्र आताही काही ठिकाणे अशी आहेत, जेथे पाऊस सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस अंदमान आणि निकोबार द्वीप समुहात जोरदार पाऊस कोसळणार आहे. ८ मे ते १२ मे पर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे दक्षिण भारतातील काही राज्यांतही पुढील पाच दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पश्चिम हिमालयीन क्षेत्रात पुढील तीन दिवस बर्फवृष्टी, पावसाचे अनुमान आहे. याशिवाय, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाबमध्येही पाऊस, गारपिटीची शक्यता आहे. दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटकमध्ये पुढील पाच दिवस पाऊस कोसळू शकतो. याशिवाय, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकलमध्ये सहा ते आठ मे यांदरम्यान पावसाचा अलर्ट आहे. गुजरामध्ये सहा ते नऊ मे तसेच कोकण, गोव्यातही हलका ते मध्यम पाऊस कोसळू शकतो.