उत्तर प्रदेशात पुरामुळे उसाचे मोठे नुकसान

656

मोरादाबाद : चीनी मंडी

उत्तराखंडमधून वाहत येणाऱ्या रामगंगा नदीला उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या ऊस शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. मोरादाबाद जिल्ह्यातील ठाकूरदरा तालुक्यात उसाच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. केवळ उभ्या पिकांमध्ये पाणी शिरलेले नाही, तर पुरासोबत वाहून आलेली माती शेतांमध्ये पसरली आहे, असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले.

ठाकूरदरा तालुक्यातील बल्लीआ, बहापूर, लालपूर, मलकपूर सेमली, यापूर, मीरपूर मोहन, मिदा, घटकपूर, सिहाली खड्डेर या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने या गावांशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. स्थानिक प्रशासनाकडून पुरवण्यात आलेल्या मोटरबोटच्या साह्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे.

मिरपूरमध्ये पुरामुळे नुकसान झालेला शेतकरी चरण सिंह म्हणाला, ‘आम्ही आधीच दुष्काळाचा सामना करत होतो. त्यातच आता पुराने ऊस पिकाचे नुकसान केले आहे. आमच्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत असलेला ऊस जमीनदोस्त झाला आहे. तहसील कार्यालयाकडे जाण्यासाठीचे रस्तेच बंद आहेत.आता सरकारकडून येणाऱ्या मदतीवरच आमचे सर्वकाही अवलंबून आहे.’

दिलारी येथील हरिराम म्हणाला,‘गावामध्ये अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यांनी आपल्या कुटुंबियांसह शाळांच्या इमारतींमध्ये आसरा घेतला आहे. प्रशासनाकडून अत्यावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत.’ पुरामुळे या गावांचा वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

पोलिस आणि निमलष्करी दलाचे जवान पूरबाधीत परिसराच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच मोटरबोट आणि औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. जिल्हाधिकारी राकेश कुमार सिंह यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिली आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here