महाराष्ट्राला पावसाचा तडाखा, १३६ हून अधिक मृत्यू, ८४,४५२ लोकांचे स्थलांतर

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा कहर सुरूच आहे. राज्यात जोरदार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रायगड जिल्ह्यातील तलाई गावात भूस्खलनामुळे ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलनाच्या या घटनेत अद्याप ४७ जण बेपत्ता आहेत तर १२ जखमींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांना वाचविण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. पावसामुळे गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात १३६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील तलाई गावात गुरुवारी रात्री भूस्खलनाची घटना घडली. या घटनेतील मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते. आतापर्यंत ४९ मृतदेह हाती लागले आहेत. एनडीआरएफ, स्थानिक आपत्ती निवारण पथक, जिल्हा प्रशासनाची पथके मदतकार्यात गुंतली आहेत.

रायगड, कोकणासह सातारा जिल्ह्यात आणखी दोन दिवस पावसामुळे रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूरातील पंचगंगा नदी, रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी आणि मुचकुंदी नदी, कृष्णा नदी आणि कोयना धरणासह वशिष्ठी नदी अद्याप धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here