नवी दिल्ली : खासदार धनंजय महाडिक यांनी साखरेची किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलचा दर वाढवण्याची केंद्र सरकारकडे केली. महाडिक यांनी केंद्रीय अन्न वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. यावेळी ते म्हणाले कि, २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. दुसरीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची एफआरपी वाढत जाते. त्यामुळे साखर कारखान्यांचा आर्थिक बोजा वाढत आहे. परिणामी उसाच्या किमान हमीभावानुसार, साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.
खासदार महाडिक म्हणाले कि, २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अजुनही साखरेला प्रतिक्विंटल ३१०० रूपये इतकाच किमान आधारभूत दर आहे. एकिकडे साखरेचा उत्पादन खर्च वाढत आहे. शासनाकडून दरवर्षी एफआरपीमध्ये वाढ केली जाते, पण त्याप्रमाणात साखर कारखान्यांची एमएसपी वाढवली जात नाही. गेल्यावर्षी उसाची किमान एफआरपी ३१५० रूपये होती. यंदा ही एफआरपी वाढवली जाईलच. पण त्याचवेळी साखरेचा उत्पादन खर्च क्विंटलमागे ४१६६ रूपये इतका झाला आहे. त्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च आणि शेतकर्यांना द्यावयाची किमान आधारभूत किंमत, यांचा विचार केला, तर साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याचे महाडिक यांनी मंत्री जोशी यांच्या निदर्शनास आणून दिले.
ख. महाडिक म्हणाले, अनेक कारखान्यांना कर्ज काढून, शेतकर्यांना एफआरपीची रक्कम द्यावी लागते. त्यामुळे साखरेच्या किमान आधारभूत वाढ किंमतीमध्ये ३१०० रूपयांपासून ४२०० रूपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांनी केली. तसेच साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवल्यानंतर, त्याचप्रमाणात इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर पाच रूपये वाढ करणे गरजेचे आहे, या मुद्दयाकडे लक्ष त्यांनी लक्ष वेधले.