राजाराम कारखाना प्रति टन ३,१०० रुपये देणार : चेअरमन अमल महाडिक

कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याने चालू हंगामातील ऊस दरात १०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी कारखान्याने प्रती टन ३,००० रुपये दर देण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र, त्यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. कारखान्यात कोणत्याही उपपदार्थाचे उत्पादन होत नसतानाही ३,१०० रुपये दर देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याने यंदा ४,५०,००० मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती चेअरमन, माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली.

महाडिक म्हणाले कि, कारखान्याने ४ डिसेंबरअखेर ६५, ७८० मे. टन ऊस गाळप केले असून, ६५, ४८० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यंदा चालू हंगामात १२ टक्के उताऱ्यानुसार प्रती टन ३,६८७.२५ रुपये एफआरपी येते. त्यामधून सरासरी तोडणी वाहतूक खर्च सुमारे ६८७.२५ रुपये वजा जाता निव्वळ एफआरपी ३,००० रुपये येते. मात्र कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसताना शेतकऱ्यांच्या उसाला जादा दर देण्यासाठी एफआरपीपेक्षा १०० रुपये जादा उचल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, माजी आमदार महादेवराव महाडिक आणि चेअरमन माजी आमदार अमल महाडिक यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here