राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीचा प्रचार समाप्त

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या जोरदार प्रचार अभियानाची शुक्रवारी समाप्ती झाली. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांनी आपापल्या बालेकिल्ल्यात रॅली काढली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावड्यात तर भाजप नेते महाडिक यांनी पुलाची शिरोली येथे रॅली काढली.

पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी जादा ऊस दर, सह उत्पादन प्लांट, इथेनॉल डिस्टिलरी आणि अनेक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे महाडिक यांनी शेतकऱ्यांना जादा ऊस दर आणि कारखान्याच्या गाळप क्षमता वाढीचे आश्वासन दिले आहे. २०१५ मध्ये पाटील यांचे पॅनेल आणि महाडिक यांच्या पॅनलमध्ये किरकोळ मतांचा फरक होता. राजकीय तज्ज्ञांच्या मते पाटील यांच्या पॅनलचा विजय जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक ठरेल.

काँग्रेसचे आमदार पाटील यांनी अलिकडील काही वर्षात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अनेकदा विजय मिळवला आहे.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांच्याकडून पराभव पत्करल्यानंतर सतेज पाटील यांनी तीनवेळा विधान परिषदेचे आमदार असलेल्या महादेवराव महाडिक यांना पराभूत केले. त्यावेळी ते विधानपरिषदेचे आमदार बनले. त्यांनी धनंजय महाडिक यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत विजयी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांनी अलिकडेच गोकुळ सहकारी दूध संस्थेत विजय मिळवला आणि महादेवराव महाडिक यांच्या आघाडीकडून सत्ता काढून घेतली. पाटील जर विजयी झाले तर तर महादेवराव महाडिक यांना आणखी एक धक्का बसेल. याचे पडसाद आगामी स्थानिक महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमटू शकतील. त्यांना या निवडणुकांमध्ये स्वतःला आणि भाजपला मजबूत करणे कठीण होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here