राजस्थान: कोटा येथे आजपासून कृषी महोत्सव, शेतकऱ्यांना मिळणार शेतीतील नव संशोधनाची माहिती

कोटा : देशभरात कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती शेतकऱ्यांना सांगण्यासाठी कोटा येथे किसान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील प्रगतीशील शेतकरी, ७५ हून अधिक स्टार्टअप्स आणि कृषी उत्पादन उत्पादकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. येथे ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक शेतीच्या एकापेक्षा एक सरस पद्धती समजावून सांगितल्या जातील. हा कृषी महोत्सव केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि राजस्थानचा कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जात आहे. दसरा मैदानावर असलेल्या राम थिएटरमध्ये कृषी महोत्सवाच्या प्रदर्शन, प्रशिक्षण मेळाव्याचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, केंद्रीय पशु, मत्स्यव्यवसाय आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बालियान या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, कृषी प्रदर्शनात स्टार्टअप्समधून शेतीतील नवनवीन शोध आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात तसेच कमी वेळेत अधिक उत्पादन व अधिक नफा मिळवता येणार आहे. प्रगतीशील शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधीही शेतकऱ्यांना मिळेल. त्यांचे अनुभव जाणून घेऊन शेतकऱ्यांना नवीन आणि शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्याची प्रेरणा मिळेल. शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच इतर व्यवसायांबाबत प्रशिक्षण व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. यासह विविध प्रकारच्या योजनांची माहिती दिली जाणार आहे. इतर प्लॅटफॉर्मवर त्यांचे उत्पादन विकण्याच्या पद्धतींबद्दलपण माहिती दिली जाणार आहे. कृषी महोत्सवात विविध कंपन्या त्यांचे कृषी ड्रोन देखील प्रदर्शित करतील. हे ड्रोन शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक काम करून खर्च कमी करण्यास मदत करतात. तसेच या कंपन्या मेळाव्यात आपल्या या ड्रोनचे डेमोदेखील देतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here