राजस्थान सरकारचा निर्णय, पेट्रोल ४ तर डिझेल ५ रुपयांनी स्वस्त

अखेर राजस्थान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट घटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये पेट्रोल ४ रुपये आणि डिझेल ५ रुपये स्वस्त होणार आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ही माहिती दिली. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये यापूर्वी पेट्रोल ११६.३४ रुपये प्रति लिटर विकले जात होते. त्यामध्ये चार रुपयांची कपात झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळेल. दुसरीकडे राजस्थान सरकारने सर्वसामान्य लोकांना मोठा झटका दिला आहे. राजस्थानमध्ये आता वीज महागली आहे. वीज बिल ३३ पैसे प्रती युनिट वाढणार आहे. राजस्थानमध्ये १.५२ कोटी ग्राहकांकडून ५५० कोटी रुपये फ्युएल सरचार्जच्या रुपात वसुल केले जाणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्वीट केले आहे की, आज, मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून पेट्रोलमध्ये ४ रुपये प्रती लिटर तसेच डिझेलमध्ये ५ रुपये प्रती लिटर दरकपात होईल. त्यामुळे राज्य सरकारच्या महसुलाला ३५०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

दिवाळीपूर्वी एक दिवस आधी केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात केली होती. यामध्ये पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर १० रुपये कर कमी करण्यात आला. यानंतर राज्य सरकारांवर व्हॅट कमी करण्याचा दबाव आला. भाजपशासीत राज्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयानंतर व्हॅटमध्ये कपात केली. मात्र, भाजप वगळता इतर राज्यांनी असा निर्णय घेतलेला नाही. यामध्ये राजस्थनचाही समावेश होता. अद्याप दिल्ली, पश्चिम बंगालनेही व्हॅटमध्ये कपात केलेली नाही. राजस्थान सरकारवर व्हॅट कपात न केल्याबद्दल टीकाही होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here