नवी दिल्ली : देशात वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४५ डिग्रीजवळ पोहोचले आहे. दररोज यात वाढ होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आणखी काही दिवस अशीच स्थिती कायम राहील. हवामान विभागाने सांगितले की, देशाच्या मोठ्या भागात आणखी पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहील. तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागात ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी देशातील अनेक शहरांचे तापमान ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले. हवामान विभागाने सांगितले की, पुढील ३ दिवस भीषण उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. उष्णतेची लाट, तापमानामुळे ६४ वर्षांचा उच्चांक मोडला जाऊ शकतो अशी शक्यता आहे.
पुढील ५ दिवसांत मध्य भारतात तर आगामी तीन दिवस पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेमुळे लोकांना अडचणीचा सामना करावा लागतो असे हवामान विभागाने सांगितले उत्तर आणि पश्चिम भारताच्या बहुसंख्य भागात २ डिग्री सेल्सिअस तापमान वाढीची शक्यता आहे. त्यानंतर कोणताही महत्त्वाचा बदल होणार नाही असे सांगण्यात येते. झारखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेशात बुधवारी तापमान सामान्य स्थितीपेक्षा ३.१ डिग्री सेल्सिअस ते ५ डिग्री सेल्सिअस अधिक होते. उत्तर-पश्चिम भारताच्या काही भागात तापमान ४७ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.