साखर कारखानदार मारतायेत शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला : राजू शेट्टींचा हल्लाबोल

कोल्हापूर / पुणे: राज्यातील सर्वच पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांना पत्र लिहून साखर कारखानदारांना त्यांच्या संबंधित वार्षिक सर्वसाधारण सभेत एफआरपीपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

राजू शेट्टी यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले की, काही मोजके कारखाने वगळता बहुतांश साखर कारखानदारांनी गत हंगामातील उसाची वाढीव रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. शेतकऱ्यांनी गाळलेल्या घामावर साखर कारखाने नफा कमवत आहेत. त्यामुळे या नफ्यातील काही हिस्सा साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असून, आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

राजू शेट्टींनी पत्रात काय म्हटले ?

गेल्या दोन वर्षापासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आहे. यामुळे साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम अदा करुन पैसे शिल्लक राहिले आहेत. यापैशांवरती शेतकऱ्यांचा अधिकार आहे. पण राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होवून या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफआरपीपेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे.

कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक

गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी ऊसापासून इथेनॅाल निर्मीती करण्यास प्राधान्य दिले. यामुळे साखर, इथेनॅाल, बगॅस, को -जन, स्पिरीट, अल्कोहोल, मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहू लागले आहेत. गतवर्षी राज्यातील सोमेश्वर, माळेगांव, विघ्नहर, भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कमेस मंजूरी घेऊन शेतक-यांना त्यांच्या हक्काचे जादा पैसे दिले आहेत. मात्र राज्यातील इतर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याचे कारण दाखवत शासनाकडे बोट दाखवून शेतकऱ्यांच्या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

ज्यादाचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचे आदेश आयुक्तांनी द्यावे…

चालू हंगामातील साखर व उपपदार्थाच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन या विषयास मंजूरी घेण्याबाबत लेखी आदेश काढून कळवण्याबाबतची मागणी केली आहे. राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश करुन या विषयास साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये हा निर्णय झाल्यास याचा राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे राजू शेट्टींनी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here