ऊस दरावरून राकेश टिकैत यांची उत्तर प्रदेश सरकारवर टीका

लखनौ : सध्याच्या गळीत हंगामात उत्तर प्रदेश सरकारने उसाच्या राज्य सल्लागार किंमतीमध्ये (एसएपी) वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत भारतीय किसान युनीयनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अखिलेश यादव आणि मायावती यांच्यापेक्षाही योगी आदित्यनाथ हे कमजोर मुख्यमंत्री आहेत का अशी विचारणा राकेश टिकैत यांनी केली आहे. टिकैत म्हणाले, २०१७ मध्ये जेव्हा हे सरकार सत्तेवर आले, तेव्हापासून उसाच्या एसएपीमध्ये फक्त १० रुपयांची वाढ झाली आहे. दरात बदल होऊन चार वर्षे उलटली आहेत. आजघडीला डिझेल, युरीया, किटकनाशके यांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. आता निम्मा ऊस कारखान्यांमध्ये पोहोचल्यानंतर सरकारने दरात बदल न करण्याचा घेतलेला निर्णय दुर्दैवी आणि शेतकऱ्यांची आर्थिक अडचण करणारा आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या मंत्रीमंडळाने ऊस उत्पादकांच्या नेहमीच्या वाणांना ३१५ रुपये प्रति क्विंटल दर देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे १२००० कोटी रुपये थकीत असल्याचा आरोप टिकैत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here