नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नियमांच्या उल्लंघनप्रकरणी तीन खासगी बँकांसह एकूण १० बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. ज्या बँकांवर ही कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये अनेक बड्या बँकांचा समावेश आहे. जम्मू अँड काश्मीर बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक यांना मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय इतर सात को-ऑपरेटिव्ह बँकांना पेनल्टी लागू केली आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आरबीआयने मोठी कारवाई करत देशातील बड्या बँकांना मोठा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, अॅक्सिस बँक आणि जम्मू अँड काश्मीर बँकेला क्रेडिट कार्डच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय ज्या इतर सात सहकारी बँकांना दंड लागू केला आहे, त्यामध्ये टेक्स्टाइल ट्रेडर्स को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, उज्जैन नागरिक सहकारी बँक मर्यादित, पानीहाटी को- ऑपरेटिव्ह बँक, द बेरहामपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक, सोलापुर सिद्धेश्वर सहकारी बँक, उत्तर प्रदेश को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि उत्तरपारा को- ऑपरेटिव्ह बँक यांचा समावेश आहे.
जम्मू अँड काश्मीर बँकेला अडीच कोटी रुपये तर बँक ऑफ महाराष्ट्रला १ कोटी ४५ लाखांचा दंड झाला आहे. ॲक्सिस बँकेला ३० लाखांचा दंड भरावा लागेल. अशाच पद्धतीने इतर बँकांना एक लाख ते २८ लाखांपर्यंत विविध रक्कमांचा दंड भरावा लागणार आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे या बँकांनी उल्लंघन केल्याची विविध प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.