मंदीमुळे गेली ५० हजार कामगारांची नोकरी

औरंगाबाद : देशात मंदी सदृश्य स्थितीचे सावट पसरु लागले आहे. याचा मोठा फटका औद्योगिक क्षेत्राला बसत आहे. अनेक उद्योगातील कामगारांवर घरी बसायची वेळ आली आहे. पंधरा दिवसात औरंगाबादमध्ये तब्बल ५० हजार कंत्राटी कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले आहे. येत्या काळात हा मंदीचा फास अधिक घट्ट आवळण्याची शक्यता असल्याचे, कामगार नेते उद्धभ भवलकर यांनी सांगितले. ते म्हणाले, औरंगाबाद मध्ये वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा रेल्वे स्टेशन आणि चितगाव या औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकारचे अडीच हजार उद्योग असून, या ठिकाणी तीन लाखाच्या जवळपास कंत्राटी कामगार काम करत आहेत. जागतिक मंदीमुळे यातील साधारणपणे ५०० उद्योग बंद पडले आहेत. या उद्योगातील तब्बल ५० हजार कामगारांना कामावरुन काढण्यात आले आहे. या मंदीमुळे कामगारांना घरचा रस्ता पकडावा लागत आहे.

जागतिक मंदीचा सर्वाधिक परिणाम ऑटोमोबाइल क्षेत्रावर झाला आहे. औरंगाबाद हा प्रामुख्याने ऑटो आणि मद्य हब म्हणून ओळखले जाते. आज हे दोन्ही उद्योग असंख्य अडचणींशी सामना करत आहेत. मोठया उद्योगांवर अवलंबून असलेल्या मध्यम व लघू उद्योगांचे या मंदीच्या काळात मोठे नुकसान होत आहे.

औरंगाबादेत स्कोडा, बजाज कंपनीवर अडीचशेहून अधिक ऑटोमोबाईल्स आणि इंजिनिअरिंगचे लघू-मध्यम उद्योग अवलंबून आहेत. या मोठ्या कंपन्यांनी चार महिन्यांपासून उत्पादन घटविले आहे. त्यामुळे लहान कंपन्या संकटात आल्या
आहेत. डिस्टिलरी, फार्मास्युटिकल्स आणि टायर कंपन्यांवरही मंदीचा परिणाम झाला आहे. वाळूजमधील बीकेटी कंपनी उत्पादनापैकी 90 टक्के टायर निर्यात करते; मात्र ही निर्यात 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे. तसेच वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा येथील डिस्टिलरीकंपन्यांतून मोठ्या प्रमाणात बिअर विदेशात जाते; परंतु तीही निर्यात घटल्याने या कंपन्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात उत्पादन पडून आहे.

दसरा-दिवाळीत नागरिकांचा वाहन खरेदी व अन्य विविध वस्तू खरेदीवर भर असतो; मात्र खरेदीदारांच्याच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारण 50 हजार कामगारांचा रोजगार गेला आहे. जे कामगार कामावर आहेत, त्यांच्या दिवळी बोनसचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्यातील दहा प्रमुख ऑर्गनाइज इंडस्ट्रिअल सेक्टरवर येत्या काही दिवसांत मंदीचा मोठा परिणाम होणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगाराच्या शोधात बहुतांश लोक शहरांत आले आहेत; मात्र आज मंदीमुळे रोजगार गमवावा लागल्याने गावाकडे परतण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी काय करावे, सरकारने काय धोरण राबविणे गरजेचे आहे, यासाठी नाशिक येथे राज्यभरातील कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. यामध्ये या परिस्थीती वर मात करण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात आल्याचे भवलकर यांनी स्पष्ट केले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here