इंधन दरवाढीमुळे नागरिकांकडून आरोग्यासह इतर गरजेच्या खर्चात कपात: एसबीआयचा अहवाल

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने झालेल्या वाढीमुळे गेल्या काही महिन्यांत महागाई वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या गरजेचे खर्चही कमी करावे लागले आहेत. एसबीआयने प्रसिद्ध केलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, नागरिकांनी आरोग्यावरील खर्चासह इतर गरजेचे खर्चही कमी केले आहेत.

अहवालात म्हटले आहे की, एसबीआय कार्डकडून खर्चाच्या विश्लेषणातून हे संकेत मिळाले आहेत. इंधनावरील खर्च वाढल्याने त्याचा ताळमेळ बसविण्यासाठी ग्राहक आरोग्यासह इतर वस्तूंच्या खर्चात कपात करीत आहेत. एसबीआय रिसर्चच्या मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्या कांती घोष यांनी सांगितले की, इंधन खर्च वाढल्याने किराणा खर्चावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे काही वस्तूंची मागणी घटली आहे. मार्च २०२१ च्या तुलनेत जून २०२१ मध्ये इंधनावरील खर्च ६२ टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिल-मे महिन्यात इतर खर्चाचा वाटा ८४ टक्क्यांवर पोहचला होता. कोविड महामारीने नागरिक त्रस्त झाले असतानाच पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भार पडला आहे. त्यामुळे नागरिकांचे मासिक बजेट बिघडले आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या सुधारणांची गती मंदावली आहे. उत्पन्न घटल्याने अनेक नागरिकांची स्थिती नाजूक बनली आहे. इंधानावरील कर कमी करण्याची गरज अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ७६ टक्क्यांनी वाढून ७५.३५ डॉलर प्रती बॅरल झाली आहे. त्यामुळे देशात पेट्रोल १०० रुपयांवर पोहोचले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here