कारखान्यांना दिलासा : साखरेचे मूल्यांकन वाढल्याने पोत्यामागे मिळणार ९० टक्के कर्ज

कोल्हापूर : राज्य सहकारी बँकेने साखर कारखानदारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बँकेने आता कर्ज मार्जिन (दुरावा) १५ वरून १० टक्के केला आहे. याशिवाय, खुल्या बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्याने माल तारणातील खुल्या साखरेचा सुधारित मूल्यांकन दर ३१०० रुपयांवरून ३४०० रुपये प्रती क्विंटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी कारखान्यांना बँकेकडून प्रती पोत्यामागे ८५ टक्क्यांऐवजी ९० टक्के कर्ज दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २८ डिसेंबर २०२३ पासून सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यासाठी कारखान्यांना सोयीचे होणार आहे.

साखरेचा मूल्यांकन दर वाढविल्याने कारखान्याकडील हंगाम २०२३-२४ मधील उत्पादित साखर पोत्यांपैकी विक्रीयोग्य साखर पोत्यांचे मूल्यांकन नव्या दराने केले जाणार आहे. साखरेचे सुधारित मूल्यांकन ३४०० रुपये प्रती क्विंटल झाल्याने उचल दर ३०६० रुपये क्विंटल झाला आहे. दरम्यान, बँक स्थायी तपासणी अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली कमी प्रतीची (खराब) साखर पोती तसेच प्रॉव्हिडंट फंड वा अन्य शासकीय यंत्रणेने जप्त केलेल्या साखर पोत्यांचे पूर्वीप्रमाणेच मूल्यांकन १३०० रुपये प्रती क्विंटल दराने केले जाणार आहे. यंदा कमी गाळप होणार असल्याने बँकांकडून कर्जाच्या वसुलीकरिता प्रती क्विंटल १०० रुपये अतिरिक्त टॅगिंग आकारले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here