सीतापूर : भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना साखर कारखानेही उपयोगी ठरत आहेत. जिल्ह्यातील जवाहरपूर येथील साखर कारखान्यात धान्यावर आधारित डिस्टिलरीची स्थापना करण्यात आली आहे. येथे तांदळापासून इथेनॉल आणि ईएनए (एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल) तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि बिहारच्या भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्हा मुख्यालयातपासून १६ किलोमीटर दूर असलेल्या दालमिया ग्रुपच्या जवाहर साखर कारखान्यात दोन प्रकारच्या डिस्टिलरी आहेत. एक उसावर आधारीत आहे. तर दुसऱ्यामध्ये धान्याचा वापर केला जातो. २४ हजार क्विंटल तांदूळ दररोज वापरुन इथेनॉल आणि ईएनएचे उत्पादन केले जाते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, येथे बिहार आणि पश्चिम बंगालमधून सर्वाधिक तांदूळ पुरवठा होतो. भारतीय अन्न महामंळाच्या विविध गोडावून्समधूनही तांदूळ पुरवठा केला जातो. ईएनएचा वापर मद्य बनविण्यासाठी केला जातो. तर इथेनॉल पेट्रोलियम पदार्थांसाठी पुरवले जाते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातही अबकारी विभागाने धान्यावर आधारित मद्य उत्पादनावर भर दिला. परिणामी जिल्ह्यात जवाहरपूर कारखान्यात ग्रेन बेस्ड डिल्टिलरी स्थापन करण्यात आली आहे. याच्या मद्याची गुणवत्ता अधिक चांगली असते असे सांगण्यात येते. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे अबकारी मंत्री नितीन अग्रवाल यांनी सांगितले.