राज्यात आयसीयू बेड्सची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध व्हावी म्हणून रेल्वे, लष्कर, पोर्ट ट्रस्ट यांना विनंती

मुंबई दि ६: गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करीत असून विविध उपाययोजना करीत या साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेगही लक्षणीयरीत्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे मात्र नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.

सध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे. पण केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयु बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकुल आदि ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये व मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.

लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे तसेच परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील हे गृहीत धरून राज्य शासनाने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नेव्ही यांना त्यांच्या रुग्णालयांच्या जागा, तसेच त्यांच्या अखत्यारीतील इतर मोठ्या इमारती व जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती केली आहे. असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here