वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

यवतमाळ : पाच तालुक्यात विस्तार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील व उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे असणार्‍या वसंत सहकारी साखर कारखान्यावर तब्बल 120 कोटी रुपयांचे कर्ज आहे. मागील तीनही हंगामात कारखान्याचे चाक फिरलेले नाही. अशा दयनीय अवस्थेत आता कारखान्याच्या संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याने सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

तीन वर्षांपूर्वी 2016 मध्ये शेतकरी सभासदांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन अविरोधपणे संचालक मंडळाची निवड केली होती. त्यानंतर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपचे अ‍ॅड. माधवराव माने यांची वर्णी लागली होती. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष असल्याने अ‍ॅड. माने यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण तरीही कारखाना सुरु होवू शकला नाही. आणि सध्या 120 कोटींचे कर्ज कारखान्यावर आहे.

या 120 कोटींपैकी, बँच्या 20 कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली. सहकार मंत्र्यांनी या कर्जमुक्तीचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार दि. 15 ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करुनही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

आता विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरु होण्याच्या सर्व शक्यता संपुष्टात आल्या. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर व सर्व संचालकांनी राजीनामे संचालक अरुण भालेराव यांच्याकडे सोपवले. आता कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
राज्यातील भाजप-शिवसेना सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माने यांनी केला. तसेच सरकारच्या निर्णयाने आंम्ही हताश झालो असल्याची खंत व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here