किरकोळ महागाई दर ५.५९ टक्क्यांवर : किराणा सामान महागले

धान्य, दुध, अंडी यांसह स्वयंपाकाच्या साहित्याच्या दरात वाढ झाल्याने डिसेंबर २०२१ मध्ये किरकोळ महागाई दर वाढून ५.५९ टक्के झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या सहा टक्क्यांच्या आसपास हा दर पोहोचला आहे. ग्राहक मूल्य सुचकांकावर आधारीत किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर २०२१ मध्ये ४.९१ टक्के आणि डिसेंबर २०२० मध्ये ४.५९ टक्के होता. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पत धोरण आढावा समितीकडून या आकडेवारीवर भर दिला जातो. सरकारने आरबीआयला किरकोळ महागाई दर दोन टक्क्यांनी घट-वाढीसह ४ टक्के म्हणजे दोन ते सहा टक्क्यांमध्ये ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ पासून किरकोळ महागाई दरात वाढ होत आहे. जुलै महिन्यातही महागाईचा दर वाढून ५.५९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. मात्र, नंतरच्या दोन महिन्यांत यात घट झाली होती.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडील आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यात अन्नधान्य महागाई दर वाढून ४.०५ टक्के झाला. गेल्या महिन्यात तो १.८७ टक्के होता. अन्नधान्यापैकी धान्य, त्यापासून बनणारी उत्पादने, अंडी, दूध, दुधापासून तयार होणारे पदार्थ, मसाले, तयार भोजन, स्नॅक्स, मिठाई यांचा महागाईचा दर डिसेंबरमध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत अधिक होता. मात्र, भाजीपाला, फळे, तेल आदी बाबींच्या महागाईच्या दरवढाचा वेग कमी झाला आहे. इंधन श्रेणीतील महागाई कमी झाली आहे. इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की सकल ग्राहक महागाई २०२१-२२च्या चौथ्या तिमाहीत ५.७ टक्के ते सहा टक्के या दरम्यान राहिल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here