नवी दिल्ली : देशातील सरकारी गोदामांतील गहू आणि तांदळाचा साठा गेल्या पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. त्याचवेळी, सप्टेंबर महिन्यात किरकोळ अन्नधान्याच्या किमतीने १०५ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. भारतीय अन्न महामंडळाकडील (एफसीआय) आकडेवारीनुसार, सार्वजनिक गोदामांमध्ये गहू आणि तांदळाचा एकूण साठा १ ऑक्टोबरअखेर ५११.४ लाख टन होता. गेल्यावर्षी समान कालावधीत हा साठा ८१६ लाख टन होता. गहू आणि तांदळाचा साठा २०१७ नंतरच्या सर्वात निच्चांकी पातळीवर आला आहे.
जनसत्तामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, एक ऑक्टोबर रोजी गव्हाचा साठा २२७.५ लाख टन असून ही सहा वर्षांतील नीचांकी पातळी आहे. मात्र बफर स्टॉक २०५.२ लाख टनापेक्षा किंचित जास्त आहे. तथापि, तांदळाचा साठा आवश्यक पातळीपेक्षा सुमारे २.८ पट अधिक आहे. गेल्या चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत एफसीआयच्या गोदामांमध्ये कमी धान्य उपलब्ध आहे. एफसीआयच्या गोदामांमधील साठा कमी होणे ही चिंतेची बाब आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीत सप्टेंबर महिन्यात गहू आणि आट्याचा वार्षिक किरकोळ महागाई दर १७.४१ टक्क्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला आहे. गेल्या आठ महिन्यांतील ही सर्वोच्च स्थिती आहे. आगामी काळात दर कमी होतील अशी शक्यता नाही. शेतकऱ्यांनी अद्याप गव्हाची पेरणी केली नसून पुढील पीक १५ मार्चनंतरच बाजारात येईल अशी शक्यता आहे.