रोहतक : रोहतक सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना २० कोटी ७९ लाख रुपयांची ऊस बिले अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक प्रदीप अहलावत यांनी दिली. कारखान्याने शेतकऱ्यांना २१ नोव्हेंबर २०२१ ते ५ डिसेंबर २०२१ या काळातील ऊस बिले दिली आहेत. यापुर्वी कारखान्याने सध्याच्या गळीत हंगामापासून २० नोव्हेंबर २०२१ पर्यंतची १० कोटी ७८ लाख रुपयांची बिले आधीच अदा केली आहेत. कारखान्याने आतापर्यंत एकूण ३१ कोटी ७५ लाख रुपयांची बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. हरियाणा राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनध्ये बिले देण्यात रोहतक कारखाना अग्रेसर आहे.
प्रदीप अहलावत यांनी सांगितले की, सध्या साखर कारखाना गाळप हंगामात चांगली कामगिरी करत आहे. या हंगामात आतापर्यंत क्षमतेचा उपयोग करून १०३.६७ टक्के केला आहे. हरियाणा राज्यातील सहकारी साखर कारखान्यात ही क्षमता चांगली आहे. कारखान्याने आतापर्यंत १७ लाख पाच हजार क्विंटल उसाचे गाळप करत १,४४,४५० क्विंटल साखर उत्पादन केले आहे. हरियाणातील सहकारी साखर क्षेत्रात कारखाना द्वितीय क्रमंकावर आहे. सध्या कारखान्याचा साखर उतारा ९.७० टक्के आहे.
मुख्य व्यवस्थापकांनी सांगितले की कारखाना प्रशासनाने गळीत हंगाम सुरू केल्यानंतर उसाचे गाळप, साखर उतारा, क्षमता यांसह इतर बाबतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आवश्यक पावले उचलली आहेत. शेतकऱ्यांनी स्वच्छ ऊस पाठवावा यासाठी कारखान्याने आवाहन केले आहे. कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सर्व विभागांच्या समन्वयाने कारखाना चांगली कामगिरी करत आहे.