भीमा पाटस कारखान्याकडून एफआरपीपेक्षा ६५ रुपये जादा दर : रविकांत पाटील

पुणे : भीमा पाटस साखर कारखान्याने २०२२-२३ या गळीत हंगामातील संपूर्ण एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याने प्रतिटन २५० रुपयांसह एफआरपीपेक्षा ६५ रुपये जादा दिल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे रोलर पूजन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक एम.डी. फरगडे, तुकाराम ताकवणे, अप्पासाहेब हंडाळ, तुकाराम अवचर, मुकेश गुणवरे, अरुण भागवत, नामदेव शितोळे आदी उपस्थित होते.

भीमा-साइप्रिया कारखान्याची एफआरपीची रक्कम थकल्याने साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कारखान्याची मालमत्ता जप्त करून एफआरपीची रक्कम द्यावी, असा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना २३ ऑगस्ट २०२३ ला दिला होता. एफआरपी रकमेची तरतूद तीन दिवसांपूर्वी झाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन २५० रुपये जमा करण्यात आले आहेत. रविकांत पाटील म्हणाले, साखर उताऱ्यानुसार ३,४८० रुपये एफआरपी निघाली. यातून ७९५ रुपये तोडणी वाहतूकीचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांना निव्वळ २,६८५ रूपये प्रतिटन एफआरपी द्यावी लागत होती. कारखान्याने आतापर्यंत २,७५० रुपये प्रतिटन ऊस बिल अदा केलेले आहे. कारखान्याने कर्ज न काढता स्वनिधीतून एफआरपीची रक्कम दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here