१४ दिवसांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिले देण्यास सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनौ : कालबद्ध पद्धतीने निकाल देण्याच्या आपल्या सरकारच्या संकल्पाचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी आगामी काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात गुणात्मक वाढ करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ऊस थकबाकीबाबत योगी आदित्यनाथ यांनी १०० दिवसांत ८,००० कोटी रुपये आणि सहा महिन्यात १२,००० कोटी रुपयांची थकीत ऊस बिले देण्याचे निर्देश दिले आहेत. कृषी विभागाच्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, राज्य सरकारकडे निधीची कमतरता नाही. मात्र, आर्थिक संतुलन राखणे ही खूप महत्वाची बाब आहे.

आधुनिक कृषी तंत्रज्ञानासोबत पारंपरिक कृषी विज्ञानाचा उपयोग करण्यावर भर देताना योगी म्हणाले की, कृषी शिक्षण आणि कृषी संशोधन हे शेतकऱ्यांना पूरक आणि त्यांना उत्तरदायी असे बनविण्याची गरज आहे. ऊसाच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या पाच वर्षात १,६९,१५३ कोटी रुपयांची उच्चांकी ऊस बिले देण्यात आली आहेत. ते म्हणाले, थकीत ऊस बिलांपैकी १०० दिवसांत ८००० कोटी रुपये देण्याचे प्रयत्न केले जाणे अपेक्षित आहे. आणि सहा महिन्यांत १२,००० कोटी रुपयांची ऊस बिले देण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनीआगामी पाच वर्षात ऊसाची उत्पादकता ८१.५ टन प्रती हेक्टरवरुन ८४ टन प्रती हेक्टर करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. योगी यांनी सांगितले की, आमचे सरकार १४ दिवसांत ऊस उत्पादकांना बिले देण्यासाठी कटिबद्ध आहे. यासाठी सर्व ते प्रयत्न केले जाण्याची आवश्यकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here