डिसेंबर २०१४ नंतर रुपयात जवळपास २५ टक्क्यांची घसरण : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

नवी दिल्ली : डिसेंबर २०१४ पासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य जवळपास २५ टक्क्यांनी घसरले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि रशिया-युक्रेन संघर्ष अशी जागतिक कारणे यामागे आहेत, असे त्यांनी सांगितले. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार ३१ डिसेंबर २०१४ रोजी एक अमेरिकन डॉलरची किंमत ६३.३३ भारतीय रुपये होती. ११ जुलै २०२२ रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७९.४१ वर पोहोचला आहे. सोमवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ७९.९८ अशा नव्या निच्चांकी स्तरावर पोहोचला. भारतीय रुपयात सलग सातव्या दिवशीही घसरण झाली आहे.

लोकसभेत एका तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात सीतारमण यांनी सांगितले की, रशिया-युक्रेन सारख्या जागतिक घडामोडी, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ हे रुपयाचे अवमूल्यन होण्यास कारणीभूत आहेत. मात्र, त्यांनी सभागृहाला सांगितले की, भारतीय चलन इतर प्रमुख जागतिक चलनांच्या तुलनेत मजबूत आहे. ब्रिटीश पाऊंड, जपानी येन आणि युरोसारखे चलन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयापेक्षा अधिक कमजोर झाले आहेत. त्यामुळे भारतीय रुपया २०२२ मध्ये या चलनांच्या तुलनेत मजबूत झाला आहे. सरकारने दावा केला की, चलनातील घसरणीमुळे निर्यातीमधील प्रतिस्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील सकारात्मक वाढ दिसून येईल. चलनाचे अवमूल्यन आयातीला अधिक महाग बनून बाजारपेठेला प्रभावित करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here