नवी दिल्ली : रशियाने युक्रनेवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गेल्या सात वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत. भारतातील पुरवठा व्यवस्थेवर सध्या कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, रशिया-युक्रेन युद्धाने जागतिक मार्केट दबावाखाली असल्याचे दिसले. आशियाई मार्केटची सुरुवात कमकुवत रुपात झाली. रशिया-युक्रेन युद्धाला गती आल्याने कच्च्या तेलाच्या दराने उसळी घेतली. बुधवारी ट्रेडिंगवेळी ब्रेंट क्रूड ५ टक्क्यांनी वाढून ११० डॉलर प्रती बॅरलवर पोहोचले. हा सात वर्षांचा उच्चांक आहे. डब्ल्यूटीआयही ४.८८ टक्के वाढून १०८.६४ डॉलरवर पोहोचले.
हिंदी गुड रिटर्न्स डॉट इनवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीत अनेक देशांतील पेट्रोल-डिझेलचा दर उच्चांकी स्तरावर आहे. मात्र, भारतात दिवाळीनंतर यात कोणताही बदल झालेला नाही. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ होऊ शकते. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये प्रती लिटर तर डिझेल ८६.६७ रुपये प्रती लिटर आहे. मात्र, यात १२ ते १५ रुपये प्रती लिटरची वाढ होऊ शकते. सध्याचा पेट्रोल दर हा ८२ -८३ डॉलर प्रती बॅरल दरावेळच्या स्थितीत आहे. त्यामुळे तेल कंपन्यांना दररोज मोठे नुकसान होत आहे. एक डॉलर पेट्रोल-डिझेल दरवाढीने ५० पैशांची वाढ होते. सध्या तर जवळपास २७ डॉलरची वाढ झाली आहे.