सातारा : अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने रयत सहकारी साखर कारखाना चालवून पूर्णपणे कर्जमुक्त झाला आहे. यंदा कारखाना पूर्ण क्षमतेने म्हणजेच दैनंदिन ५ हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप करणार आहे, अशी माहिती अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी दिली. कराड तालुक्यातील शेवाळेवाडी- म्हासोली येथील रयत कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले की, यंदा कारखाना १४ मेगावॅट वीजनिर्मितीही करणार आहे. रयत कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर पडावा यासाठी संस्थापक विलासराव पाटील यांनी अथणी कारखान्याबरोबर करार केला. त्या निर्णयाचा फायदा झाला आहे. कारखाना शासकीय देणे वगळता पूर्णपणे कर्जमुक्त झाला आहे.
अथणी – रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख म्हणाले की, कारखान्याचे यावर्षी ७ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या हंगामात कारखान्याने ४ लाख ६० हजार मेट्रिक टन गाळप करत तालुक्यात उच्चांकी प्रती टन २९२५ रुपये एकरकमी दर दिला आहे. यावेळी आप्पासाहेब गरुड, रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष लक्ष्मण देसाई, कऱ्हाड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल मोहिते, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, प्रा. धनाजी काटकर उपस्थित होते. शैलेश देशमुख यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. संचालक प्रदीप पाटील यांनी प्रास्तविक केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक अॅड. शंकरराव लोकरे यांनी आभार मानले.