एस. जे. शुगर कारखान्याला सर्वपक्षीय पाठबळ : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : मालेगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी, नागरिक एस. जे. शुगर साखर कारखान्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. साखर कारखाना व रावळगाव-अजंग औद्योगिक वसाहत गावाला पुनर्वैभव मिळवून देईल, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. रावळगाव (ता. मालेगाव) येथील एस. जे. शुगर डिस्टिलरी आणि पावर प्रा. लि. कारखान्याचे गव्हाण पूजन व गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्र्यांसह साखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते गळीत हंगाम प्रारंभ झाला.

पालकमंत्री भुसे म्हणाले की, चॉकलेट व साखरमुळे रावळगाव हा देशातील ब्रॅन्ड आहे. एस. जे. शुगर कंपनीने रावळगाव एस. जे. शुगर असे नामकरण करावे. रावळगाव हा खासगी क्षेत्रातील देशातील पहिला साखर कारखाना आहे. कारखाना व परिसरातील शेती सिंचनासाठी त्यावेळी चणकापूर धरण बांधले गेले. चॉकलेटमुळे जगभरात रावळगावचा नावलौकिक आहे. कारखाना पुन्हा सुरु झाल्याने स्थानिकांना रोजगार मिळाला ही आनंदाची बाब आहे. कारखान्याला लागेल ते सर्व सहकार्य करू. रावळगाव-अजंग औद्योगिक वसाहतीत वर्षाअखेरीस आणखी ५० प्रकल्पांचे भूमिपूजन केले जाईल. रावळगाव कारखाना व औद्योगिक वसाहत रावळगावसह पंचक्रोशीच्या वैभवात भर घालेल.

यावेळी माजी आमदार योगेश टिळेकर, कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड, उपाध्यक्ष दत्तात्रेय आंबेकर, सुरेश निकम, राजेंद्र भोसले, दिलीप दळवी, ॲड. शिशिर हिरे, प्रा. के. एन. आहिरे, नरेंद्र सोनवणे, संदीप पवार, भाऊसाहेब पगार, नरेंद्र आहिरे, कान्हू जाधव, नामदेवराव पाटील, दिलीप जाधव, शेखर पवार, कल्याण पाटील, राकेश पाटील, हरीआण्णा जाधव आदी उपस्थित होते. संचालक कुंदन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक एस. के. भाकरे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष अरुण नरके यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here