विधानसभा निवडणुकीत साखरसम्राट आमने-सामने शक्य !

अहिल्यानगर : लोकसभा निवडणुकीनंतर आता अनेकांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. शेवगाव – पाथर्डी मतदारसंघात तीन साखरसम्राट विधानसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत. आमदार मोनिका राजळे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे हे तीन वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर, केदारेश्वर या कारखान्यांचे साखरसम्राट विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला लागले आहेत.

जि. प. च्या माजी सदस्या हर्षदा काकडे यांच्यासह आणखी काही इच्छुक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.त्यादृष्टीने मतदारसंघात राजकीय जुळवाजुळव सुरू झाली आहे.जनशक्ती मंचच्या व माजी जि.प. सदस्या हर्षदा काकडे दहा वर्षांपूर्वी हुकलेल्या आमदारकीला परत गवसणी घालण्याच्या दृष्टीने तयारीला लागल्या आहेत. त्याचबरोबर वंचित आघाडी, मनसे, कम्युनिस्ट, अपक्ष अशा वेगवेगळ्या पक्षांचा काय निर्णय होतोय, यावर उमेदवारांची संख्या ठरणार आहे.आमदार राजळे यांना भाजपची, तर ॲड. प्रताप ढाकणे यांना महाविकास आघाडीची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी या पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी इतर इच्छुक प्रयत्नशील आहेत.

नेतेमंडळींची कार्यक्रमांना हजेरी

विधानसभा निवडणूक पार्श्वभीमीवर नेतेमंडळी वाढदिवसासह इतर छोट्या मोठ्या कार्यक्रमांस उपस्थित लावताना दिसत आहे. ही उपस्थिती म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारीच असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त या मतदारसंघात बरीचशी राजकीय उलथापालथ होणार आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला राजकीय गणिते बदलणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here