सांगली : साखर साठेबाजीवर केंद्राची करडी नजर; पाच व्यापाऱ्यांच्या दुकानांसह गोदामांची तपासणी

सांगली : साखरेच्या दरात झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने साखरेच्या साठेबाजीवर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने केंद्रीय भरारी पथक आणि जिल्हा पुरवठा विभागाच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सांगली शहरातील मार्केट यार्ड आणि गणपती पेठ परिसरातील पाच साखर व्यापाऱ्यांच्या दुकानांसह गोदामांची तपासणी केली. या कारवाईत कोणत्याही व्यापाऱ्याकडे निर्धारित मर्यादेपेक्षा म्हणजेच चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा आढळून आला नाही.

जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली. पुणे येथील भारतीय अन्न महामंडळाचे (एफसीआय) व्यवस्थापक जन्मजय सिंग, भोपाळ येथील अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सहायक संचालक योगेश्वरुदु बोया, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, लेखापरीक्षण साखर विभागाच्या अधिकारी शीतल चोथे आणि पुरवठा निरीक्षक राजू कदम यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

ChiniMandi WhatsApp Channel

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनाने मोठ्या साखर व्यापाऱ्यांच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. व्यापाऱ्यांनी चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी निर्धारित मर्यादेत साखरेचा साठा ठेवत आहेत की नाही, याची तपासणी केली जात आहे.

गुरुवारी मार्केट यार्ड परिसरातील दोन, तर गणपती पेठ परिसरातील तीन अशा एकूण पाच व्यापाऱ्यांच्या दुकानांसह गोदामांची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कोणत्याही व्यापाऱ्याकडे चार हजार क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा आढळला नसल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिली. या कारवाईमुळे साखरेच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, बाजारातील साखरेचे दर स्थिर ठेवण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

साखर साठ्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याच्या सूचना

व्यापाऱ्यांनी त्यांच्या साखरेच्या साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर नियमितपणे अद्ययावत करावी, अशा सूचना केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दर शुक्रवारी केंद्र शासनाच्या तीन संकेतस्थळांवर साखरेच्या साठ्याची माहिती नोंदविणे बंधनकारक आहे. तपासणीदरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक साखरेचा साठा आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी दिला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here