सांगली : पाणी टंचाईचा फटका, ऊसाची वाढ खुंटली

सांगली : जिल्ह्यात गतवर्षी पावसाने दडी मारली. त्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. त्यामुळे आडसाली हंगामातील उसाच्या लागवडीच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे चित्र आहे. तर आता पाण्याची कमतरता भासत असून उसाची वाढ खुंटली आहे. उसाला फुटवे कमी झाले आहेत. पाणी कमी पडत असल्याने त्याचा परिणाम ऊस पिकावर होऊ लागला आहे. पीक वाढीच्या काळात पाणी कमी पडत असल्याने उत्पादनातही घट होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

नुकताच संपलेल्या गाळप हंगामात १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवरील कारखान्यांनी गाळप केले. जिल्ह्यात आडसाली हंगामात उसाची लागण ३२ हजार ७८३ हेक्टरवर झाली आहे. एकूण १ लाख ७ हजार ८५० हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार ८३८ हेक्टरने क्षेत्रात घट झाली आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा आढावा घेत ही लागवड केली आहे. सध्या आडसाली हंगामातील ऊस ८ ते १० कांडीवर आहे. तर पूर्व हंगामातील ऊस पीक फुटव्याच्या अवस्थेत आहे. याच काळात जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट तीव्र होऊ लागले आहे. ऊस पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here