सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जन आक्रोश पदयात्रा सुरू

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनआक्रोश पदयात्रेला गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात करण्यात आली. साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उसाला प्रती टन अतिरिक्त ४०० रुपये दर द्यावा यांसह विविध मागण्यांसाठी काढण्यात येणारी ही पदयात्रा जिल्हाभर फिरणार आहे. एकूण २२ दिवस ६०० किलोमीटर अंतर पदयात्रा पूर्ण करणार असून १ नोव्हेंबर रोजी कुंडल येथे कोल्हापूरमधून सुरू झालेल्या जनआक्रोश यात्रेचा मिलाफ होणार आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी शेट्टी म्हणाले की, गेल्या हंगामात साखरेला चांगला दर मिळाला. कारखान्यांना इथेनॉलपासून चांगले उत्पन्न मिळाले. मात्र, कारखानदारांनी फक्त एफआरपीनुसार पैसे दिले आहेत. उत्पन्नातील अतिरिक्त भाग म्हणून ४०० रुपये प्रती टन शेतकर्‍यांना मिळावेत, त्याशिवाय कारखाने सुरू करू देणार नाही.

दरम्यान, जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आरग, कवठेमहांकाळ, उदगिरी, सोनहिरा, तासगाव, विटा या कारखान्यावरून कुंडल येथे येणार आहे. यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त कारखान्यावरून सुरू झालेली पदयात्रा कुंडल येथे येईल. तेथून या पदयात्रा एकत्र क्रांती, हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्यावर जातील. सात नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील उस परिषदेत याचा समारोप होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here