उसाच्या सीओ ०२३८ प्रजातीवर लालसड रोगामुळे वैज्ञानिक अलर्ट

कर्नाल : उसाच्या सीओ ०२३८ प्रजातीचा कॅन्सर म्हटल्या जाणाऱ्या लाल सड रोगाची लक्षणे उसावर आता दिसून येत असल्याने वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न गतिमान झाले आहेत.

कर्नाल ऊस संशोधन संस्थेच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष तथा मुख्य वैज्ञानिक डॉ. एस. के. पांडे आणि संशोधक डॉ. एम. एम. छाबडा यांनी सांगितले की, उत्तर भारतात ज्या राज्यांनी या प्रजातीच्या उसाची लावण केली आहे, तेथील शेतकऱ्यांना या रोगाच्या नियंत्रणाचे उपाय सांगण्यात आले आहेत. ऊसावर या रोगाचा फैलाव झाला तर हळूहळू पिक नष्ट होते. उत्तर भारताच्या बहुसंख्य विभागात सीओ ०२३८ या प्रजातीची लागवड करण्यात आली आहे. या प्रजातीचा ऊस आणखी काही काळ राहील. चांगले उत्पादन मिळत असल्याने कारखाने तसेच शेतकऱ्यांवर याचा परिणाम होऊ नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे.

याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्यांनी लालसड रोगाचा फैलाव झालेल्या ऊसाला प्राथमिक टप्प्यातच नष्ट करावे. शेताची पाहणी करून रोगग्रस्त रोपे उखडून टाकावी. एप्रिल ते जुलै या कालावधीत ही प्रक्रिया केली पाहिजे. उखडलेली रोपे एखादा खड्डा काढून पाच ते दहा ग्रॅम कार्बेंडेझम,५० डब्ल्यूपी पावडर टाकून मातीने झाकावी. त्यानंतर रोगग्रस्त ऊस, त्याचे अवशेष जाळून नष्ट करावेत. अशा शेतामध्ये किमान एक वर्ष उसाची लागवड करू नये. पाण्याचा वापरही टाळावा. रोगग्रस्त पिकावर ४०० ग्रॅम थायोफिनेट मिथाईल औषध तीनशे लीटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर दोनवेळा फवारावे. शेतात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here