धाराशिव : परंडा तालुक्यातील सोनारी व वाशी तालुक्यातील भैरवनाथ शुगर कारखान्याने २०२२-२३ हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन १०० रुपये प्रमाणे दुसरा हप्ता बैल पोळा सणाच्या अनुषंगाने देण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा जिप माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सावंत म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कारखान्याचे संस्थापक डॉ. तानाजी सावंत व चेअरमन प्रा. शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर वर्क्स लि, सोनारी व वाशी युनिटसाठी हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपास आलेल्या उसासाठी बैल पोळा सणानिमित्त १०० रुपये प्रति टन दुसरा हप्ता काढण्यात आला आहे. तत्पुर्वी हंगाम २०२२-२३ मधील उसाला एफआरपी २२०० रुपये प्रति मेट्रीक टन प्रमाणे ऊस उत्पादक शेतकरी यांना अदा केलेली आहे. त्यामुळे प्रति टन एकूण २३०० रुपये दर झाला आहे. सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गत गळीत हंगामात ४ लाख ८६ हजार २५५ मेट्रीक टन उसाचे गाळप केल्याची माहिती सावंत यांनी यावेळी दिली.