अवकाळी पावसात पिक सापडल्यानंतर झालेल्या दरवाढीमुळे अनेकांच्या स्वयंपाकघरातून टोमॅटो गायब झाल्याचे चित्र आहे. टोमॅटो पिकाच्या नुकसानीमुळे उत्पादनात जी घसरण झाली आहे, त्यामुळे दर महिनाभरात गगनाला भिडले आहेत. दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत आणि युपीपासून पंजाबमधील मंडयांपर्यंत टोमॅटोचा दर ७० रुपये प्रती किलोपर्यंत गेला आहे. फुटकरमध्ये टोमॅटोची १०० रुपये प्रती किलोने विक्री केली जात आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृ्तानुसार, टोमॅटोच्या वाढत्या दरामुळे महगाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. अनेकांच्या स्वयंपाकाचे बजेट बिघडले आहे. दररोज वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा, बटाटा, टोमॅटो यांचा समावेश होतो. मात्र, महिनाभरात टोमॅटोच्या दरात जबरदस्त तेजी दिसून येत आहे.
किरकोळ मार्केटमध्ये याची विक्री ६५ ते ७० रुपये प्रती किलो दराने सुरू आहे. मात्र, महिनाभरापूर्वी टोमॅटो घाऊक बाजारात १० ते २० रुपये प्रती किलो दराने विकला जात होता. दोन आठवड्यापूर्वी याचा दर ३० ते ३५ रुपये आणि किरकोळ बाजारातील विक्री दर ४० ते ४५ रुपयांवर आला होता. त्यानंतर आता हा दर दुप्पट झाला आहे. दिल्लीत टोमॅटो ७० ते १०० रुपये किलो, मध्य प्रदेशातील इंदौर, भोपाळसारख्या शहरांमध्ये ८० ते १०० रुपये किलो असे दर आहेत.
मध्य प्रदेशात सर्वाधिक टोमॅटोचे उत्पादन होते. तरीही सध्या येथे दरवाढ झाल्याचे दिसून येत आहे. मध्य प्रदेशनंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा आणि गुजरातमध्ये टोमॅटो उत्पादन अधिक होते. टोमॅटोसह हिरवी मिरची, आल्ले, गाजर, बिन्स, ढब्बू मिरची यांच्या दरातही वाढ झाल्याने महागाईचा झटका ग्राहकांना बसत आहे.