आणखी चार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

कोल्हापूर, ता. 22 : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 63 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसूली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर आणि बगॅस विक्रीतून वसुली करण्यात येणार आहे.

आरआरसी कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज, कापसी, साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्‍स, पाटण तालुक्‍यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना आणि खटाव तालुक्‍यातील ग्रीन पॉवर शुगर्स, गोपुज या चार कारखान्यांचा समावेश आहे.

या चार कारखान्यांकडे एफआरपीपोटी सुमारे 27 कोटी रुपये थकीत रक्‍कम आहे. ही थकीत रक्‍कम वसूल करण्यासाठी साखर कारखान्यांतील उत्पादित साखर विक्रीतून शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, असे आदेशात नमूद केले आहे. या कारवाईसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात 2018-19 मध्ये एकूण 195 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. या कारखान्यांनी 952 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपोटी 23 हजार 293 कोटी रक्‍कम देय होती. त्यापैकी 22 हजार 915 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here