सेवा हेच आपले शस्त्र राहील,कोविड योद्ध्यांचे पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडून आभार

मुंबई : महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे असे आवाहन केले आहे

मुख्यमंत्री आपल्या पत्रात पुढे म्हणतात की, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहितांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची आणि मराठी मातीची महान परंपरा आहे. संकटकाळात तो मागे हटत नाही. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याप्रमाणे कणखर होतो. आज आपण सगळेच कोरोनाच्या भीषण संकटाशी युद्ध करत आहोत. हे युद्ध साधे नाही. या युद्ध संकटात एक “सैनिक” बनून आपण कोविड योद्धा म्हणून मैदानात उतरला आहात. माझ्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झाला आहात, हे निश्चितच कौतूकास्पद आहे.

हे युद्ध सुद्धा सीमेवरील सैनिकांप्रमाणेच लढावे लागेल. महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक जणू आज एक सैनिक बनूनच संकटाचा मुकाबला करतांना दिसत आहे. आपणासारखे कोविड योद्धे आता युद्धात उतरल्याने मला मुख्यमंत्री म्हणून मोठे बळ मिळाले आहे. ही एक प्रकारे देश आणि देवपुजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे. शस्त्रापेक्षा ही मोहीम आपल्याला सेवेने जिंकायची आहे. थोडक्यात सेवा हेच आपले शस्त्र राहील. हा महाराष्ट्र, महाराष्ट्रातील जनता आपल्या रक्ताची आणि नात्याचीच आहे. महाराष्ट्राच्या हाकेला प्रतिसाद देत आपण पराक्रमाच्या परंपरेस जपत आहात. आपले आभार कसे मानवेत ? ही सेवा महाराष्ट्राच्या व शिवरायांच्या चरणी रुजू झाल्याशिवाय राहणार नाही.

महाराष्ट्रात कोविड योद्धा साठी प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये ३७६६ अर्ज मुंबईसाठी आहेत.यात वैद्यकीय क्षेत्रातील अर्जांची संख्या १७८५ आहे तर इतर क्षेत्रासाठी १९८१ अर्ज आले आहेत. मुंबईमध्ये उपचारासाठी ज्या जम्बो सुविधा निर्माण करण्यात येत आहेत त्यात काम करण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योध्याना बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नियुक्तीपत्र देण्याची कार्यवाही सुरु आहे.

कोविड योद्धा म्हणून काम करण्याची तयारी दर्शविलेल्या सर्व कोविड योध्याना सलाम करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्यांना व्यक्तिशः पत्र लिहुन आभार व्यक्त केले आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here