शामली : साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांची थकीत ऊस बिले २० जूनपर्यंत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर शामलीतील शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. यासोबतच साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक राहुल लाल यांनी संपूर्ण ऊस बिले देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दोआब साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू राहिले. यादरम्यान भाजपचे वरिष्ठ नेते आणि जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष मनीष चौहान, तहसीलदार प्रशांत अवस्थी, जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादुर आणि शामली ऊस सहकारी समितीचे सचिव मुकेश राठी, शामली साखर कारखान्याचे युनिट हेड सुशील चौधरी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकऱ्यांनी एक महिन्यातील थकीत ऊस बिले देण्याची मागणी कारखान्याकडे केली. मात्र, कारखाना प्रशासन १० दिवसांची बिले देण्याच्या मुद्यावर अडून राहिले होते.
यानंतर मनीष चौहान, डीसीओ विजय बहादूर सिंह, ऊस समितीचे सचिव मुकेश राठी यांनी युनिट हेड सुशील चौधरी यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी रविंद्र सिंह यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी १५ दिवसांची बिले २० जूनपर्यंत देण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर या महिन्याच्या अखेरपर्यंत इतर बिले देण्याची योजना तयार करण्यास होकार दिला. त्यानंतर शेतकरी नेते ईश्वर सिंह, विनोद निर्वाल यांनी बेमुदत आंदोलन मागे घेतले. यावेळी प्रेम सिंह, प्रितम सिंह कंडेला, रामकुमार, उदयवीर सिंह बनत, राजवीर सिंह, कुंवरवीर गोहरनी, अमित बेनीवाल, श्रीपाल सिंह, नेत्रपाल, मांगेराम, रोशनलाल, यशपाल सिंह, बलराम संजीव लिलोन, रविंद्र आदी उपस्थित होते.